1 Samuel 1

1एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम ह्या नगरामधील एक माणूस होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता. 2त्याला दोन बायका होत्या एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.

3तो माणूस आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याचे भजनपूजन करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन मुलगे हफनी व फिनहास देवाचे याजक होते. 4यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली बायको पनिन्ना हिला व तिचे सर्व मुलगे तिच्या सर्व मुली यांना वाटे देत असे.

5परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो प्रीती करत असे पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. 6परमेश्वराने तिचे गर्भस्थान बंद केले होते यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे.

7तो प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारा सोबत देवाच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे. 8तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला नेहमी म्हणक असे, हन्ना तू कां रडतेस? का खात नाहीस आणि तुझे ह्रदय का दु:खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?

9मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक मंदिराच्या खांबाजवळच्या आपल्या आसनावर बसला होता. 10तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती देवाजवळ प्रार्थना करून फार रडली.

11नवस करून बोलली हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात देवाला देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.

12आणि असे झाले की ती देवाच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले दिले. 13हन्ना तर आपल्या ह्रदयात बोलत होती तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले. 14तेव्हा एली तिला म्हणाला किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.

15तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली असे नाही माझ्या प्रभू मी दु:खीत आत्म्याची स्त्री आहे द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव देवापुढे ओतत आहे. 16आपली दासी दुष्ट बाई आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या क्लेश व यातना यांमुळे आतार्यंत बोलले आहे.

17मग एली उत्तर देऊन म्हणाला, सुखरूप जा व इस्राएलाचा परमेश्वर याच्याजवळ जे मागणे तू मागितले ते तो तुला देवो. 18ती बोलली आपल्या दासीवर तुमची कृपादृष्टी होऊ द्या. मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने खाल्ले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.

19आणि सकाळी त्यांनी उठून देवाचे भजनपूजन केले; मग ती निघून रामा येथे आपल्या घरी गेली. आणि एलकानाने आपली बायको हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली. 20आणि असे झाले की, नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्याला देवापासून मागून घेतले.

21आणि तो माणूस एलकाना आपल्या सर्व कुटुंबासहीत देवाला वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला. 22परंतु हन्ना वर गेली नाही कारण ती आपल्या नवऱ्याला म्हणाली मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्याला नेईल, आणि तो देवापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील. 23तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो. मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले.

24आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्याला शिलो येथे देवाच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल लहान होते. 25मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.

26आणि ती म्हणाली माझ्या प्रभू आपला जीव जिवंत आहे; माझ्या प्रभू, जी स्त्री देवाची प्रार्थना करीत येथे तुमच्याजवळ उभी राहिली होती, ती मीच आहे. 27या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी देवापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे. म्हणूनच मी तो देवाला उसना दिला आहे तो जगेल तोपर्यंत तो देवाला उसना दिलेला आहे. तेव्हा तेथे त्याने देवाची आराधना केली.

28

Copyright information for MarULB